पिंपरी चिंचवडच्या दोन उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांनी खचून न जाता चहाचा व्यवसाय सुरू केलाय. महिन्याकाठी दोघे प्रत्येकी साठ हजार रुपये कमावतायेत. विशेष म्हणजे ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलं त्याच शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयाजवळ ते चहा विकतायेत.
एमसीए डिग्री घेतलेला अक्षय राऊत आणि एमबीएची डिग्री असलेला संकेत चौघुले पिंपरी-चिंचवडमधील एकाच संस्थेतून बीसीए पास आऊट झाले. पुढं अक्षयने त्याच संस्थेत एमसीए तर संकेतने एमबीएसाठी दुसरी संस्था निवडली. 2015 ला दोघांचं शिक्षण पूर्ण झालं. यानंतर दोन्ही उच्चशिक्षित तरुणांनी नोकरीसाठी तीन वर्षं जंग-जंग पछाडली, मात्र त्यांना नोकरी काही मिळाली नाही. अखेर ज्या संस्थेतून बीसीए झाले, त्याच संस्थेच्या आकुर्डी येथील कॉलेजजवळ दोघांनी ‘रत्ना अमृततुल्य’ या नावाने चहाचा व्यवसाय सुरू केला…
ज्या हातांनी कोडिंग-डिकोडिंग करायचं ते अक्षयचे हात आज फक्कड चहात गुंतलेत, तर संकेत संवादातून ग्राहकांमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी आपल्या शिक्षणाचा वापर करतोय…
कोणतीही तमा न बाळगता, या दोघांनी त्यांच्या शिक्षणाचा लेखाजोखा दुकानाबाहेर जाहीर केलाय. त्यामुळेच या उच्चशिक्षितांची सांगड आणि चहाची चव अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीत उतरली आहे.
रोजगारातून वार्षिक तीन लाखांचे पॅकेज मिळवण्याचं उद्दिष्ट बाळगलेल्या दोघांना या व्यवसायातून महिन्याकाठीच प्रत्येकी साठ हजार रुपये मिळू लागलेत. म्हणूनच बेरोजगार तरुणांना ते खचून न जाता व्यवसायात उतरण्याचा सल्ला देतायेत. न खचता, न डगमगता अक्षय आणि संकेतने चहाचा व्यवसाय सुरू करत बेरोजगार तरुणांपुढे आदर्श निर्माण केलाय. या दोघांनी आता भविष्यात ‘रत्ना अमृततुल्य’च्या अनेक शाखा उघडण्याचा चंगही बांधलाय…
रोजगारनिर्मितीबद्दल बोलताना चहाचा व्यवसाय, भजी तळणं, टायरचं पंक्चर काढणं यांसारख्या व्यवसायांचा पंतप्रधानांच्या भाषणांतून अनेकदा उल्लेख झाल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. मात्र प्रत्यक्षात रोजगाराची ही व्याख्या अनेक तरुणांनी स्वीकारली आहे. त्यातच एकेकाळी चहा विकणारे नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधान झाल्याने, चहाला ‘अच्छे दिवस’ आले आहेत. त्यामुळं उच्चशिक्षित तरुण चहाच्या व्यवसायाकडे वळताना दिसतायेत. अक्षय आणि संकेत यांच्या चहा व्यवसायातील भरारीने उच्चशिक्षित बेरोजगारांमध्ये नक्कीच नवचैतन्य निर्माण होईल.