राज्याच्या पोलीस खात्यातील १०० कोटी रुपयांच्या लाचखोरी आणि खंडणी रॅकेटच्या आरोपाशी निगडित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) लवकरच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित १०० कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. मुंबईतील बार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचं अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला सांगितल्याचं परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने याप्रकरणी दोन वेळा माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याची नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात जाऊन चौकशी केली असून, न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी परमबीर सिंग यांचाही जबाब नोंदवला जाणार आहे. त्यासाठी ईडी हे समन्स परमबीर सिंह यांना बजवाणार असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणाचा तपास सुरु असून ईडीने अनिल देशमुख यांची मुंबई आणि नागपुरमधील घरे आणि कार्यालयांवर छापे टाकले. अनिल देशमुख यांचे दोन सचिवही ईडीच्या कोठडीत आहेत.