मध्य रेल्वेचा पुन्हा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या प्लेटफॉर्मवर दोन ट्रेन समोरासमोर आल्या ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठा रेल्वे अपघात होता होता टळला. आज दुपारी मध्य रेल्वेतील बदलापूरकडून येणारी लोकल चुकीने प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर घेतल्याची घटना समोर आली आहे. मात्र त्याच वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आधीच दुसरी लोकल उभी होती.
सीएसएमटीच्या बाहेर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही समस्या जाणवत आहे. या गोंधळामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अनेक तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ते 8 दरम्यान दुपारी 3.18 वाजल्यापासून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे वाहतूक प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आता अनेक लोकल आणि लांब पल्याच्या अनेक रेल्वे गाड्या मागे घेण्यात आल्या आहेत.
Central Railway Shocking News | मध्य रेल्वेचा पुन्हा गोंधळ! दोन लोकल आल्या समोरासमोर
सीएसएमटी स्थानकात दोन लोकल समोरासमोर,
सिग्नल बिघडल्याने दोन लोकल समोरासमोर,
बदलापूर लोकल 4 ऐवजी 5 नंबर प्लॅटफॉर्मवर आली.
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
मध्य रेल्वे विस्कळीत,… pic.twitter.com/JPAqw0j3eD — Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) April 21, 2026
सिग्नलमध्ये निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी कर्मचारी वेगाने काम करत आहेत. मध्य रेल्वेच्या या गोंधळामुळे मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. अर्धा तास होऊनही सीएसएमटीवर लोकल रखडलेल्या असल्याने मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. असे असताना सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने आता प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सीएसएमटीतील या गंभीर घटनेमुळे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले. प्रवाशांना गर्दी, उशीर आणि गैरसोयीचा सामना करावा लागला असून रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.