दुबई: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण होत आहे. या युद्धाचे पडसाद आता शेजारील देशांपर्यंत पोहोचताना दिसत असून दुबईतही सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आज दिनांक 16 मार्च 2026 रोजी, सोमवारी सकाळी दुबईमध्ये एक ड्रोन कोसळल्यानंतर जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील इंधन साठवण टाकीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर दुबई सिव्हिल डिफेन्सच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व प्रकारची उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत काही उड्डाणे अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विमानतळ परिसरातील एअरपोर्ट स्ट्रीट आणि एअरपोर्ट टनेल या मार्गांवरील वाहतूकही काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.
A drone incident in the vicinity of Dubai International Airport (DXB) affected one of the fuel tanks. Dubai Civil Defence teams are currently working to bring the fire under control. No injuries have been reported so far. — Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 16, 2026
दुबई सिव्हिल एव्हिएशन प्राधिकरणाने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळाजवळ येऊ नये, अशी स्पष्ट सूचना नागरिकांना दिली आहे. विमानतळ प्रशासनानेही सर्व प्रवाशांनी आपल्या उड्डाणांबाबतची अद्ययावत माहिती ऑनलाइन माध्यमातूनच तपासावी आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन केले आहे.
अलीकडच्या काळात विमानतळ परिसरात ड्रोनशी संबंधित धोक्यांच्या घटना वाढत असल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. यापूर्वीही दुबई विमानतळ परिसरात काही हल्ल्यांचे प्रकार घडले असून त्यात काही लोक जखमी झाल्याच्या घटना नोंदल्या गेल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रशासनाने अधिक खबरदारी घेत संपूर्ण विमानतळ परिसर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Dubai Civil Aviation Authority announces the temporary suspension of flights at Dubai International Airport as a precautionary measure to ensure the safety of all passengers and staff. Travellers are advised to contact their respective airlines for the latest updates regarding… — Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 16, 2026
दरम्यान, गेल्या आठवड्यातही दुबई विमानतळावर ड्रोन हल्ल्याची घटना घडली होती. त्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकासह चार जण जखमी झाले होते. जवळपास दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक शहरांमध्ये सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली आहे. दुबईतील या ताज्या घटनेमुळे या प्रदेशातील अस्थिरता अधिकच वाढल्याचे स्पष्ट होत आहे.