दुबई: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (Dubai International Airport, DXB) परिसरात दोन ड्रोन कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन घानाचे नागरिक, एक बांग्लादेशी नागरिक आणि एक भारतीय नागरिकाचा समावेश असल्याचे दुबई मीडिया ऑफिसने स्पष्ट केले आहे. सुदैवाने सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
घटनेनंतर दुबई विमानतळ परिसरात तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गल्फ प्रदेशात सुरक्षेचा इशारा अधिक कडक करण्यात आला आहे. या ड्रोनचा उगम नेमका कुठून झाला किंवा ते कोणत्या कारणाने कोसळले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Authorities confirm that two drones fell in the vicinity of Dubai International Airport (DXB) a short while ago, resulting in minor injuries to two Ghanaian nationals and one Bangladeshi national, and moderate injuries to one Indian national. Air traffic is operating as normal. — Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 11, 2026
मात्र संयुक्त अरब अमिरातीच्या एअर डिफेन्स सिस्टमने अलीकडील काही तासांत संशयित ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना हवेतच निष्प्रभ केल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली आहे. दुबई विमानतळ हा जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक मानला जातो. तरीही या घटनेचा विमान वाहतुकीवर कोणताही मोठा परिणाम झालेला नसून उड्डाणे नियमितपणे सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना इराणकडून गल्फ प्रदेशातील काही देशांवर प्रतिहल्ल्यांचे प्रयत्न वाढल्याचे वृत्त आहे. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, बहरेन आणि कुवैत या देशांना लक्ष्य करत ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी अबू धाबीतील रुवैस रिफायनरी परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे आग लागल्याची घटनाही समोर आली होती.
दरम्यान, यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी भारत सरकारने सावधगिरीचा इशारा देत ॲडव्हायजरी जाहीर केली आहे. दुबई आणि अबू धाबीमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी सतर्क राहावे, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिकांनी दुबईतील भारतीय दूतावास (+971-4-3971222) किंवा अबू धाबीतील दूतावास (+971-2-4492700) येथे संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि दुबईतील भारतीय दूतावास जखमी भारतीय नागरिकाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आवश्यक ती मदत आणि समन्वयासाठी भारतीय दूतावास प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे.