बारामती : बारामतीत पत्नीने पतीला जिवंत पुरण्याचा प्रकार उघडकीस आलेल्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आरोपी पत्नीने आपल्या पतीला ठार मारून घरातच कायमचे पुरून टाकण्याचा कथित कट रचला होता. मात्र, डायल 112 वर आलेल्या एका अज्ञात फोनमुळे हा थरारक कट पोलिसांनी उधळून लावत पतीचा जीव वाचवला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात आरोपी पत्नीविरोधात 313/2026 अन्वये बीएनएस कलम 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जुलैपर्यंत मिळालेली पोलीस कस्टडी संपल्यानंतर पोलिसांनी आज आरोपी महिलेला बारामती न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी तपासा कामी न्यायालयाकडे पोलीस कस्टडी मागितली होती. यावर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.
पीडित पती प्रविण प्रकाश जगताप यांना या घटनेसंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, मला माझी पत्नी गुंगीचे औषध देत होती. माझा करोडो रुपयांचा इन्शुरन्स आहे. त्यामुळे मला माझ्या पत्नीने जीव मारण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप पती प्रकाश जगताप यांनी केला आहे. तसेच माझी दोन्ही मुले सासरचे घेऊन गेले आहेत. माझ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे माझ्या मुलांना माझ्याकडे स्वाधीन करावे, अशी मागणी प्रविण प्रकाश जगताप यांनी केली आहे.