सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर ड्रोन गिरट्या घालताना दिसला आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी विशेष सुरक्षा दलाच्या अधिका-यांनी पोलिसांना माहिती दिली. पंतप्रधान मोदींचे निवासस्थान नो-फ्लाय झोन अंतर्गत येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी ड्रोन उडताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. एसपीजीने दिल्ली पोलिसांना याची माहिती देताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी ५ वाजता एसपीजीने दिल्ली पोलिसांना माहिती दिली. यानंतर दिल्ली पोलीस या ड्रोनचा शोध घेऊ लागले होते. पोलीस याप्रकरणी तपास करत असून अद्याप काहीच हाती लागलेलं नाही.
हा ड्रोन नेमका कोण उडवत होतं, तसंच तो पंतप्रधानांच्या निवासस्थानी कसा पोहोचला याची माहिती पोलीस मिळवत आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, “पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ एका अनोळखी उडत्या वस्तूची माहिती एनडीडी नियंत्रण कक्षाला मिळाली होती. आजूबाजूच्या परिसरात व्यापक शोधमोहीम राबवण्यात आली. परंतु अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी देखील संपर्क साधण्यात आला, परंतु त्यांनाही पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ अशी कोणतीही उडणारी वस्तू सापडली नाही.”