Jaysingrao Pawar Passed Away : ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; मराठेशाहीचा भाष्यकार हरपला

केवळ संशोधकच नव्हे, तर एक 'विद्यार्थिप्रिय प्राध्यापक' म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर होती. डॉ. पवार यांच्या लेखणीत एक वेगळीच धार आणि सत्यनिष्ठता होती.

Jaysingrao Pawar Passed Away : ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; मराठेशाहीचा भाष्यकार हरपला

कोल्हापूर: इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत वर्तमानाला दिशा देणारा एक तेजस्वी तारा निखळला आहे. मराठेशाहीच्या देदीप्यमान इतिहासाचे साक्षेपी संशोधक आणि राजर्षी शाहू विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज गुरुवारी पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज देणाऱ्या या 'इतिहासमहर्षी'ची प्राणज्योत मालवल्याने, महाराष्ट्राच्या वैचारिक आणि संशोधन क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला, मात्र त्यांचे कर्मक्षेत्र कोल्हापूर राहिले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 1964 मध्ये त्यांनी संशोधन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी केवळ इतिहास वाचला नाही, तर तो अत्यंत तटस्थपणे आणि पुराव्यानिशी समाजासमोर मांडला.

करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा विसर पडलेल्या समाजाला त्यांच्या चरित्र लेखनातून पुन्हा एकदा ऐतिहासिक जाणीव करून देण्याचे महान कार्य डॉ. पवार यांनी केले आहे.

हेही वाचा: Satara Accidents: साताऱ्यात मृत्यूचे तांडव! काही तासातच एकामगोमाग एक भीषण अपघात, प्राध्यापिकेसह तिघांचा अंत

केवळ संशोधकच नव्हे, तर एक 'विद्यार्थिप्रिय प्राध्यापक' म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर होती. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी अध्यापन केले असून, त्यांच्या लेखणीतून उतरलेली 20 हून अधिक क्रमिक पुस्तके आजही एम.ए. पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आधार आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, त्यांची धोरणे आणि सामाजिक समतेचा विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी ते आयुष्यभर झटले. 'राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणून ओळखला जातो.

डॉ. पवार यांच्या लेखणीत एक वेगळीच धार आणि सत्यनिष्ठता होती. सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा आणि दादोजी कोंडदेव यांच्याविषयी त्यांनी केलेली मांडणी ही संशोधक किती अभ्यासू असावा, याचा वस्तुपाठ आहे. त्यांचे 'पंचगंगा तिरी' हे आत्मचरित्र केवळ त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा प्रवास नाही, तर तो एका कालखंडाचा इतिहास आहे. 25 हून अधिक ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी शिवकाळ आणि शाहू काळ जिवंत ठेवण्याचे काम केले.

'शब्दांपलीकडील इतिहास' समजून घेण्याची त्यांची दृष्टी अजोड होती. कोल्हापूरच्या मातीशी आणि विचारांशी त्यांचे अतूट नाते होते. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यक्ती गेली नाही, तर इतिहासाची एक चालती-बोलती शाळा बंद झाली आहे. त्यांच्या जाण्याने मराठेशाहीच्या इतिहासातील एका सुवर्णकाळाचा शेवट झाला आहे, अशा भावना इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. डॉ. जयसिंगराव पवारांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

हेही वाचा: Jitendra Awhad: 'फडणवीसांचं पद जावं म्हणून मंत्रतंत्र', जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number