महाराष्ट्र देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. लोक अत्यंत असुरक्षित आहेत. सरकारच्या नेतृत्त्वाखाली सर्वात असुरक्षित जर कोणतं राज्य असले तर ते महाराष्ट्र आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत.
यावेळी राऊतांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात कोणालाही केव्हाही तुरुंगात टाकलं जाईल. केंद्रात आणि राज्यात असलेले महाराष्ट्रातील मंत्री उघडपणे कोणालाही पोलिसांच्या नावाने तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देतात.
पोलिसांचा वापर भाडोत्री गुंडाप्रमाणे करू नका. महाराष्ट्र कायद्याच्या राज्यासाठी देशात प्रसिद्ध होतं. अत्यंत सुरक्षित असलेल्या या राज्यातील पोलीस आणि तपास यंत्राणांची प्रतिष्ठा जगात होती, ती अशाप्रकारे राजकीय स्वार्थासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी रसातळा नेऊन महाराष्ट्राचं नाव बदनाम करु नका, असही राऊत म्हणाले.
राजकीय खेळीसाठी कुणावरही गुन्हे दाखल केले जात आहेत. आधी शिवसेनेचे तुकडे करा हे भाजपचे धोरण आहे. भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. आणि त्यासाठीच त्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले, असा गंभीर आरोप पुन्हा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.