राज्यात दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरिही नागरिक बेफिकिर असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे ओमायक्रॉन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. कठोर निर्बंध लावण्याची वेळ आमच्यावर आणू नका, अशा इशारा आरोग्यमंत्र्यानी नागरिकांना दिला आहे.
दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनसंदर्भात भाष्य केले आहे. ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ऑक्सिजनचा वापर ५०० मॅट्रिक टनापर्यंत खाली आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात रुग्णांना दररोज ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजन वापरण्याची गरज निर्माण होण्याची गरज भासली तर लॉकडाऊन लागण्याची शक्यता असले, असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले आहे.
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ४१५हून अधिक झाली आहे. तर सर्वाधिक १०८ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत महाराष्ट्रात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.