ठाणे: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची आवडती रेल्वे असलेल्या ‘दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस’ बाबत मध्य रेल्वेने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वेने या गाडीच्या वेळापत्रकात काही सुधारणा केल्या असून, 12 जानेवारी 2026 पासून नवीन वेळा लागू होणार आहेत. जर तुम्ही येत्या काही दिवसांत कोकणात जाण्याचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, अन्यथा तुमची गाडी चुकण्याची शक्यता आहे.
दिवा स्थानकातून सुटणाऱ्या 10105 डाऊन दिवा – सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ही गाडी सकाळी 6:25 वाजता सुटत असे, मात्र नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी आता 10 ते 15 मिनिटे आधीच म्हणजेच सकाळी 6:00 ते 6:15 च्या दरम्यान दिवा जंक्शन सोडणार आहे. यामुळे प्रवाशांना आता पहाटे आणखी लवकर स्थानकावर पोहोचावे लागणार आहे.
वेळेतील हा बदल केवळ सुटण्याच्या ठिकाणापुरता मर्यादित नाही. गाडी लवकर सुटणार असल्याने पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ आणि सिंधुदुर्ग या सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर ही एक्सप्रेस आता 10 ते 15 मिनिटे आधीच पोहोचणार आहे. त्यामुळे मधल्या स्थानकांवरून बसणाऱ्या प्रवाशांनीही रेल्वेच्या अधिकृत ॲपवर वेळ तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
केवळ जातानाच नव्हे, तर परतीच्या प्रवासासाठी असणाऱ्या 10106 अप सावंतवाडी रोड – दिवा जंक्शन एक्सप्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडीदेखील आता नियोजित वेळेपेक्षा 10–15 मिनिटे आधी धावणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असली, तरी सावंतवाडीहून निघताना प्रवाशांनी वेळेचे चोख नियोजन करणे आवश्यक आहे.
मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की, हे बदल 12 जानेवारी 2026 पासून कायमस्वरूपी लागू होतील. अचानक झालेल्या या बदलांमुळे नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटकांची धावपळ होऊ नये, यासाठी रेल्वेने ही माहिती आधीच जाहीर केली आहे. प्रवासापूर्वी रेल्वेचे संकेतस्थळ किंवा ॲपवर आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक पुन्हा एकदा खात्री करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दिवा आणि पनवेल ही स्थानके कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्य केंद्र आहेत. सकाळच्या सत्रात स्थानकांवर मोठी गर्दी असते, त्यातच गाडीची वेळ अलीकडे आल्याने ऐनवेळी धावपळ होऊ शकते. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी किमान 20 मिनिटे आधी स्थानकावर पोहोचणे हिताचे ठरेल.