भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी गुरुवारी, विधानपरिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
अजित पवार यांनी ‘महाराष्ट्रद्रोही’ असे वक्तव्य केले होते. याविरोधात विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाच्या सूचनेचे पत्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिले आहे.
याआधी, विरोधकांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘देशद्रोही’ या वक्तव्याविरोधात हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली होती. यांनतर, मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानावर खुलासा केला. ‘ते वक्तव्य विरोधीपक्ष नेत्यांबद्दल नसून नवाब मालिकांबद्दल होते, नवाब मलिक यांचे संबध देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींशी होते म्हणून, नवाब मलिक देशद्रोहीच आहेत’, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
सोमवारी ( २७ फेब्रुवारी ) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारी ( १ मार्च ) विधानसभेत उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधातही हक्कभंग प्रस्तावाची मागणी करण्यात आली होती. बुधवारी ( १ मार्च ) कोल्हापुरात “हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे”, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे, सर्वच पक्ष संजय राऊतांविरोधात आक्रमक झाले होते. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची मागणी करणारे पत्र दिले. यानंतर संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला. पुढे या प्रकरणी वेगवान घडामोडी होत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ सदस्यांची हक्कभंग समिती स्थापन केली आहे. तसेच, हक्कभंग प्रकरणावर ८ मार्चला निर्णय देण्यात येणार आहे, असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.