पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी बॉम्बसदृश्य वस्तू आढळली. या वस्तूमध्ये स्फोटकाच्या स्वरुपातील संशयास्पद वस्तू तापासासाठी रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, तासभर बंद करण्यात आलेली रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.
पुण्यात रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू आढळ्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २वरील वाहतूक थांबवण्यात आली होती. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आलं. संबंधित वस्तू रेल्वे स्थानकाच्या नजीकच्या मैदानात नेण्यात आली आहे. सध्या पोलीस याठिकणी पोहोचले असून बॉम्ब डिफ्युज करणाऱ्या पथकाने तत्काळ कार्यवाहीला सुरुवात केली आहे. ही बॉम्बसदृश्य वस्तू म्हणजे जिलेटिनच्या कांड्या असल्याचं प्राथमिक वृत्त असून हे कारस्थान कोणी केलं, याचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, बीडीडीएसने जिलेटिनच्या कांड्या ताब्यात घेऊन निकामी करण्यासाठी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात नेल्या. तेथे या कांड्या निकामी करण्यात आल्या. बॉम्ब आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, बॉम्बसदृश्य वस्तू निकामी केली असून तासभरानंतर पुण्यातील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक शोध घेत आहेत.