Dhurandhar Movie: रणवीर सिंहच्या अभिनयाने भारलेला ‘धुरंधर’ सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकत दमदार कमाई केली आहे. हेरगिरी, भारत–पाकिस्तान तणाव आणि थरारक मिशन्स अशा कथानकावर उभा असलेला हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत होता. पण चित्रपटाचा हा यशाचा प्रवास चालू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘धुरंधर’ला मध्यपूर्वेतील सहा देशांमध्ये प्रदर्शित करण्यास पूर्ण मनाई करण्यात आली आहे.
रणवीरसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांची मजबूत स्टारकास्ट असल्याने ‘धुरंधर’वर प्रकाशझोत आधीपासूनच होता. अॅक्शन, इमोशन, आणि रहस्यपूर्ण वळणांनी भरलेल्या कथेमुळे चित्रपट सोशल मीडियावर सतत ट्रेंडिंगमध्ये दिसत आहे. भारतात या चित्रपटाचे कलेक्शन वेगाने वाढत असून तिकीट बारीवर ‘धुरंधर’ने आतापर्यंत तब्बल १८० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. विकेंड्समध्ये अनेक ठिकाणी हाउसबुल्स लागल्याने पुढील काही दिवसही चित्रपटाचा जोर कमी होणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.
परंतु आंतरराष्ट्रीय वितरणाच्या दृष्टीने मात्र निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरात या सहा देशांनी ‘धुरंधर’ला स्थानिक सेन्सॉर बोर्डांकडून मंजुरी नाकारली आहे. म्हणजे या देशांमध्ये चित्रपटाचा एकही शो होणार नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, चित्रपटातील काही संवेदनशील भू-राजकीय दाखले आणि कथानकातील गुप्तहेरांच्या संदर्भामुळे हा निर्णय घेण्यात आला असून तेथील सांस्कृतिक धोरणांच्या दृष्टिकोनातून चित्रपट योग्य नाही, असे मत सेन्सॉर बोर्डाने नोंदवले आहे.
या बंदीमुळे या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर राहणाऱ्या भारतीय प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियावरून चित्रपटाने कोणताही अपमानकारक मजकूर न दाखवता केवळ कथा मांडली आहे, मग बंदीची गरज काय, असा सवाल उपस्थित करत आहेत. निर्मात्यांनी देखील त्यांच्या बाजूने सर्व आवश्यक दस्तऐवज आणि फेरतपासणीसाठी आग्रह धरल्याचे समजते. मात्र सर्व प्रयत्नांनंतरही अंतिम निर्णय बदलला नाही आणि ‘धुरंधर’ला तिथे रिलीजची परवानगी मिळाली नाही.
या बंदीचा चित्रपटाच्या एकूण आंतरराष्ट्रीय कमाईवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. विशेषत: गल्फ देशांमध्ये बॉलिवूड चित्रपटांना कायमच मोठी मागणी असते. त्यामुळे ‘धुरंधर’ला या बाजारपेठेचा फायदा घेण्याची संधी गमवावी लागणार आहे. तरीही भारतातील घसघशीत कमाई आणि प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, चित्रपटाची लोकप्रियता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
‘धुरंधर’वरून निर्माण झालेली ही आंतरराष्ट्रीय चर्चा मात्र चित्रपटाला आणखी जास्त प्रसिद्धी देत आहे. बंदीमागचे नेमके कारण काय, याची उत्सुकता वाढत असून यामुळेही चित्रपटाबद्दलची चर्चा सोशल मीडियावर जोमात सुरू आहे.