राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळ सुरु आहे. यादरम्यान सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केलेली क्लीप व्हायरल झाली आहे. यावरुन पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावरुन धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप खोटी आहे. ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी.
अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे.
मी विरोधासाठी नाही तर परळीच्या विकासासाठी राजकारण करतोय.
या निवडणुकीत आपण फक्त परळीच्या विकासासाठी लढतोय. परळीतील नागरिकांचाही या लढ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काही जणांना निकाल लागण्याआधीच पराभवाची भीती वाटू लागली आहे. म्हणून ही विकासाची निवडणूक पुन्हा भावनिकतेच्या मुद्यावर आणण्याचा काहींचा प्रयत्न सुरू झाला आहे.
पण हा प्रयत्न व्यर्थ ठरणार हे निश्चित. मी जे कधी बोललोच नाही त्याच्या खोट्या क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत.मी आजपर्यंत कोणाचेही वाईट केले नाही, कोणाचे वाईट चिंतिले नाही. माझ्या विरोधकांबाबत मी कधी अपशब्द देखील वापरला नाही.
काहींनी तर मला राक्षस म्हणून हिणवलं पण मी माझे तत्व सोडले नाही. मी कालही तत्वाचे राजकारण करत होतो आजही तत्वाचे राजकारण करत आहे. मी माझ्या १५०० बहिणींचे कन्यादान केले आहे. मी कधीही कोणत्याच महिलेबाबत चुकीच्या शब्दांचा वापर करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.