राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी कंबर कसली आहे. अपक्षांनी निवडणुकीत मदत करावी असे प्रयत्न मविआ आणि भाजपकडून सुरू आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपाकडून पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तीन उमेदवार आहेत. दरम्यान, भाजपकडून मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत दोन तास चर्चा केली.
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुनज विकास आघाडीकडे तीन आमदारांची मते आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी साथ द्यावी, असे धनंजय महाडिक म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेसाठी महाविकास आघाडी की भाजप, कोणत्या पक्षाला मत द्यायचे हे अद्याप ठरवले नसल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. १० जून रोजी राज्यसभा निवडणुका पार पडणार असून योग्यवेळी निर्णय घेऊ, अशी घोषणा हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार बहुजन विकास आघाडीला किंमत देत नाही. मविआकडून समाजवादी पार्टीच्या खच्चीकरणाचे प्रयत्न होत आहेत. तसेच मविआचे नेतृत्व अपक्षांना भेटत नसल्यामुळे बविआ आणि सपाचे आमदार मविआवर नाराज आहेत. मविआमध्ये अपक्ष आमदारांना सन्मान मिळत नसल्याचा आरोपही बविआ आणि सपाच्या नाराज आमदारांनी केला आहे. त्यामुळे या आता मविआत तणाव निर्माण झाला असून मविआला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सहाव्या जागेसाठी भाजपाकडून अपक्ष आमदारांवर भाजपकडून ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. तसेच अपक्ष फोडण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.