Lalbaugcha Raja Donation: राज्यासह देशभरात अत्यंत उत्साहात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवात मुंबईतील जगप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळला आहे. सामान्य नागरिकांपासून ते चित्रपटसृष्टीतील कलाकार, राजकीय नेते आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण राजाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. या श्रद्धेच्या प्रवाहात भक्तांनी लालबागच्या राजाला भरभरून दान दिले असून उत्सव सुरू झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या केवळ 3 दिवसांत तब्बल 3.18 कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. यामध्ये रोख रकमेसह तब्बल 647.47 ग्रॅम सोने (अंदाजे मूल्य 98.9 लाख रुपये) आणि 12,389 ग्रॅम चांदी (अंदाजे मूल्य 30.35 लाख रुपये) यांचा समावेश आहे. भक्तांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंमध्ये सोन्याचे दागिने, बांगड्या, साखळ्या, चांदीचे पेन आणि नक्षीकाम केलेली आकर्षक क्रिकेट बॅट यांसारख्या अनोख्या वस्तूंचा समावेश आहे.
दिवसेंदिवस वाढतोय देणगीचा ओघ
मंडळाकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पहिल्याच दिवशी भक्तांनी 48.5 लाख रुपयांची रोख रक्कम, 66.77 ग्रॅम सोने आणि 2806 ग्रॅम चांदी अर्पण केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी दानाचा ओघ अधिकच वाढला; या दिवशी 88.9 लाख रुपयांची रोख रक्कम, 226.12 ग्रॅम सोने व 5,516 ग्रॅम चांदी जमा झाली. तर तिसऱ्या दिवशी, 17 सप्टेंबर रोजी 53 लाख रुपये रोख, 354.58 ग्रॅम सोने आणि 4,067 ग्रॅम चांदी राजाच्या चरणी सुपूर्द करण्यात आली. एकूण रोख रक्कम पाहता तीन दिवसांत 1.9 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला आहे.
हेही वाचा – Gauri Aavahan 2026: जळगावमध्ये पारंपारिक पद्धतीने गौरीचे आगमन, घराघरांत भक्तिमय वातावरण
बँक अधिकारी व ट्रस्टच्या उपस्थितीत मोजणी
लालबागच्या राजाच्या पेटीत जमा होणाऱ्या या अफाट देणगीची मोजणी अत्यंत पारदर्शक आणि कडक सुरक्षेत केली जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) वरिष्ठ अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी आणि 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' ट्रस्टच्या सदस्यांची विशेष समिती या कामावर देखरेख करत आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर ही सर्व रक्कम सुरक्षितपणे बँकेत जमा करण्यात येईल. गणेशोत्सव ट्रस्टतर्फे वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय धर्मादाय उपक्रमांसाठी या निधीचा पूर्ण वापर केला जातो, अशी माहिती मंडळाच्या प्रतिनिधींनी दिली.