नाशिकमध्ये आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विकासकामे, रस्त्यांची अवस्था आणि आगामी महाकुंभाच्या तयारीबाबत अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या. नागरिकांना कारणे सांगण्यापेक्षा त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्या, असे स्पष्ट निर्देश देत त्यांनी सर्व विभागांनी अधिक गांभीर्याने काम करण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. ज्या ठेकेदारांवर किंवा संबंधित यंत्रणांवर खड्डे बुजवण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करावी. एवढेच नव्हे तर अशा संबंधितांचे पुढील कामही थांबवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून, "लोकांना कारणे सांगू नका, त्यांना समाधान द्या," असा स्पष्ट संदेश दिला. केवळ कार्यालयात बसून काम भागणार नाही, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन नागरिकांशी संवाद साधावा आणि समस्या समजून घ्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
आगामी महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज अधोरेखित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाकुंभासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत असेल, तर आपण कुठे कमी पडत आहोत याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. "असे रिलॅक्स राहून चालणार नाही. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी ओळखून वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करावे," असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चेंबरमध्ये बसून काम करण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याचे निर्देश दिले. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महाकुंभाच्या तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घेण्यास सांगितले.
बैठकीच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील एका महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्या बैठकीपर्यंत विकासकामांमध्ये आणि प्रशासनाच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा दिसली पाहिजे. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.