विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने 10 रुपयात थाळी देण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकार आल्यावर राज्य मंत्रिमंडळाची आता ‘शिवभोजन’ योजनेला मंजुरी मिळाली आहे. आता ‘शिवभोजन थाळी योजना’ राज्य सरकार ही योजना प्रायोगिक तत्वाववर सुरु करणार आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यासाठी तीन महिन्यात 6 कोटी 48 लाख खर्च अपेक्षित आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किमान एक भोजनालय तसेच प्रत्येक भोजनालयात कमाल 500 थाळी सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून नंतर ही योजना राज्याच्या इतर भागात राबवण्यात येईल.
30 ग्रॅमच्या दोन चपात्या
100 ग्रॅमची एक वाटी भाजी
150 ग्रॅमचा एक मूद भात
100 ग्रॅमचे एक वाटी वरण
शिवभोजनाची थाळीची किंमत 10 रुपये
ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहतील
‘शिवभोजन’ थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये इतकी राहील.
प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येऊन त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येईल.
शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान असेल.
शिव भोजनालय सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची पर्याप्त जागा असणे गरजेचे.
योजना राबविण्यासाठी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येणार.
त्यासाठी महापालिका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार.
गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त असलेल्या जिल्हा रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये यासारख्या ठिकाणी थाळीची विक्री केली जाणार.