देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनावरील बूस्टर डोसचे धोरण निश्चित करण्याच आदेश केंद्र आणि राज्य सरकारसह पालिका प्रशासनाला देण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तर, या याचिकेवर 27 एप्रिल रोजी सुनावणी पार पडणार आहे.
देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्रालयाकडून करण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये केंद्र सरकारने लसीकरणाचे दोनही मात्रा घेण्याचे आवाहन केले होते. आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे त्यामुळे बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचे मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी बूस्टर डोसची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. बूस्टर डोस घेतल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यामूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली आहे.
देशातील अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्यमंत्रालयाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्रालयाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहनही आरोग्य मंत्रालयाने केला आहे. तसेच लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 3 एप्रिल रोजी मुंबईत 75 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 एप्रिल रोजी 172 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, दिल्लीत 3 एप्रिल रोजी 293 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 2 एप्रिल रोजी 400हून अधिक रुग्णांची नोंद झाली.