वृत्तसंस्था, गुजरात
गुजरातमध्ये सिंहांनी घेरलेल्या रुग्णवाहिकेत प्रसूती झाली. जाफराबाद तालुक्यातल्या लुंसापूर गावात ही घटना घडली. प्रसूतीवेदना सुरू झाल्यानं महिलेच्या कुटुंबानं रुग्णवाहिका बोलावली.
रुग्णवाहिका गावापासून थोडं दूर गेल्यावर रस्त्यावर अचानक सिंहांचा कळप आला. कळपात जवळपास 8 ते 10 सिंह होते. रुग्णवाहिकेच्या चालकानं त्यांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बाजूला व्हायला तयार नव्हते.
ते रुग्णवाहिकेभोवतीच फिरत होते. त्यामुळे रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी फोनवरून डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन महिलेची प्रसूती केली. बाळाच्या जन्मानंतर सिंह हळूहळू बाजूला गेले. त्यानंतर रुग्णवाहिका पुढे नेऊन बाळ आणि बाळंतिणीला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. हे दोघंही सुखरूप आहेत.