Crime News: फोटो, बनावट बॅज, नोटांची बंडले आणि 100 हून अधिक शर्ट…; प्राध्यापिकेच्या हत्येमागचं कारण समोर येताच सर्वच थक्क

दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिकेच्या प्रकरणात तपासादरम्यान नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

Crime News: फोटो, बनावट बॅज, नोटांची बंडले आणि 100 हून अधिक शर्ट…; प्राध्यापिकेच्या हत्येमागचं कारण समोर येताच सर्वच थक्क

दिल्ली विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका देबस्मिता पॉल यांच्या हत्येप्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला ही घटना केवळ वैयक्तिक वादातून घडल्याचे मानले जात होते. मात्र तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणामागील नियोजन आणि संशयास्पद हालचाली उघड होत आहेत. आता आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमुळे तपास यंत्रणांनाही अनेक प्रश्न पडले आहेत.

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, देबस्मिता पॉल यांच्या हत्येचा कट काही दिवसांपूर्वीच नव्हे तर अनेक महिन्यांपासून आखला गेला असावा. आरोपीने प्राध्यापिकेच्या घराचे तसेच त्यांच्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकाचे फोटो मोबाईलमध्ये साठवून ठेवले होते. याशिवाय दिल्लीतील त्यांच्या राहत्या परिसराची पाहणी केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

घर विक्रीच्या वादातून निर्माण झाला राग?

प्राथमिक तपासानुसार, आरोपी दांपत्य हे पश्चिम बंगालमधील बर्धमान येथे असलेल्या प्राध्यापिकेच्या मालकीच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. हे घर खरेदी करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र प्राध्यापिकांनी घर विकण्यास नकार दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला होता. याच वादातून आरोपीने टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, आरोपीने यापूर्वीही दिल्लीला अनेकदा भेट दिली होती. व्यवसायाच्या निमित्ताने तो वारंवार राजधानीत येत असे. त्यामुळे प्राध्यापिकेच्या घराचा परिसर आणि हालचाली त्याला चांगल्या प्रकारे माहित होत्या.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar: ‘मुलगीच का झाली?’ या प्रश्नाने उद्ध्वस्त झालं आयुष्य; छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेचं टोकाचं पाऊल

मोबाईल कॉलनंतर आखली गेली योजना?

तपासादरम्यान असेही समोर आले आहे की, आरोपीने जूनच्या सुरुवातीला भाडे देण्याच्या बहाण्याने प्राध्यापिकेशी संपर्क साधला होता. त्या कोणत्या दिवशी घरी असतील याची माहिती मिळाल्यानंतरच पुढील हालचाली करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घरातून सापडले धक्कादायक साहित्य

अटकेनंतर आरोपीच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना अनेक आश्चर्यकारक वस्तू मिळाल्या. त्यामध्ये कथित बनावट ओळखपत्रे, पोलीस दलाशी संबंधित असल्याचे भासवणारे बॅज, रेल्वे तिकीट तपासनीसासारखे दिसणारे चिन्ह यांचा समावेश आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात बनावट चलनासारखी दिसणारी बंडलेही जप्त करण्यात आली. काही बंडलांमध्ये वर आणि खाली खरी नोट ठेवून मध्ये साधा कागद भरल्याचे आढळल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारच्या युक्त्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वापरल्या जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शेकडो शर्ट आणि घड्याळांचे रहस्य

आरोपीच्या ताब्यातून 100हून अधिक शर्ट आणि अनेक महागडी घड्याळेही मिळाली आहेत. या वस्तू कुठून आल्या याचे समाधानकारक उत्तर आरोपी देऊ शकला नाही. त्यामुळे तो इतर गुन्हेगारी प्रकारांमध्येही सहभागी होता का, याची चौकशी सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत पश्चिम बंगाल पोलिसांशी संपर्क साधला आहे.

हेही वाचा: Meta Alert Saves Life : मेटा कंपनीचा 'तो' अलर्ट ठरला देवदूत! इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकून विष पिणाऱ्या तरुणाला पोलिसांनी 8 मिनिटांत वाचवले

तपासासाठी 200 हून अधिक सीसीटीव्हींची मदत

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी अनेक वेळा कपडे बदलल्याचेही उघड झाले आहे. दिल्लीत आल्यानंतर, घटना घडल्यानंतर आणि परत जाताना त्यांनी वेगवेगळे कपडे परिधान केल्याचे तपासात समोर आले.

रेल्वे स्थानकांवरील हालचाली, टॅक्सी आणि ऑटोचा वापर, तसेच पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्यानंतर घराकडे जाण्यासाठी घेतलेला वेगळा मार्ग या सर्व बाबींमुळे आरोपींनी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय अधिक बळावला आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींचे इतर गुन्हेगारी जाळ्यांशी संबंध होते का याचा शोध घेतला जात आहे. दिल्लीतील या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले असून तपासातील पुढील खुलासांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number