देहू १० जून २०२३, प्रतिनिधी : आषाढीवारी साठी देहूनगरी सज्ज झाली आहे. आज तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून हजारो वारकरी देहूनगरीत जमले आहे.विठू नामाचा जय घोष करत. संत तुकाराम महाराजांची पालखी विठ्ठलाच्या भेटीला निघणार आहे. १० जून दिवशी देहू नगरी मधून संत तुकारामांची पालखी प्रस्थान करणार आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात वारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी शेकडो वारकरी देहुत दाखल झाले असून दुपारी २ च्या सुमारास पालखी प्रस्थान ठेवेल. १९ दिवसांचा प्रवास करून २९ जून २०२३ ते ३ जुलै २०२३ या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३३८ वं वर्ष आहे.
दरवर्षी राज्यातील अनेक वारकरी या दिवसाची वाट पाहत असतात. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाने या सोहळ्याची सुरुवात होत असते. या पार्श्वभूमीवर देहुत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज सकाळी पहाटे ५ वाजता श्री’ची संत तुकाराम शिळा मंदीर, श्री विठ्ठल-रखुमाई महापूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे ५.३० वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा करण्यात आली. यानंतर ९ ते ११ दरम्यान, इनामदार वाडा येथे श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन केले जाणार आहे. यानंतर सकाळी १० ते १२ वाजता पालखी प्रस्थान सोहळा आणि काला कीर्तनाला सुरुवात होणार आहे. दुपारी २ वाजता पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार असून यावेळी अश्व व दिंड्यांचे देउळवाड्यात आगमन होणार आहे.
आज देहु नगरी मध्ये रांगोळ्यांनी रस्ते सजले आहेत. २९ जुलै दिवशी आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे. दरम्यान २० जून आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण, २२ जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण, २४ जून रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण पार पडणार आहे. तर २५ जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल तर २७ जून रोजी बाजीराव विहिर येथे दुसरे उभे रिंगण अनुभवता येणार आहे.