जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
हार्बर रेल्वे मार्गावरील टिळकनगर स्टेशनजवळ बुधवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या बाजूला दोरी सापडल्याने युवकाचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टिळकनगर स्टेशनजवळ एका युवक प्रवाशाचा मृतदेह आढळला. या प्रवाशाजवळ एकही बॅग नव्हती. टिळकनगर स्टेशनच्या तिकीट घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या झाडीमध्ये हा मृतदेह होता. या प्रवाशाचा कोणी तरी खून करुन हा मृतदेह येथे आणून फेकून दिल्याची चर्चा होत आहे. प्रवाशाच्या बाजूला दोरी सापडल्याने, त्याला फाशी देऊन मारल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला. सकाळी हा मृतदेह दिसताचं पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर नेहरूनगर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी पंचनामा करून हा मृतदेह राजवाडी रुग्णालयात पाठवला आहे.
टिळकनगर स्टेशन ते लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन मधील अंतर 200 मीटर असून, या दरम्यान ही घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि टिळकनगर पोलीस यांचा सतत पहारा असतो. ही घटना होत असताना मात्र यापैकी कोणीही तेथे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच या दोन्ही स्थानकावर चोर, पाकिटमार, गर्दुल्ले यांचा नेहमीच वावर असतो. यांना पायबंद घालण्यास या तीनही सुरक्षा यंत्रणेला अद्यापही यश मिळालेले नाही.