तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नागपूरातील अथर्व ननोरेचा मृतदेह भरतवाडा पुलावर पोत्यात बांधलेला आढळ्याने आसपासच्या खळबळ माजली आहे. नागपूरात तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अथर्व ननोरेची अपहरण करून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गिट्टीथदान परिसरातून अथर्वचं अपहरण करण्यात आलं, त्या परिसरात आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेले दोन दिवस या परिसरात तणाव होता, त्यामुळे आज तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
गुरुवारी हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान येथे निघालेल्या शोभायात्रेतून 14 वर्षीय अथर्व बेपत्ता झाला होता. काल दुपारी भरतवाडा परिसरात अथर्वचा मृतदेह आढळून आला. यावेळी मृतदेहाजवळ सापडलेल्या शोभायात्रेतील स्वयंसेवकाच्या ओळखपत्रावरून अथर्वची ओळख पटली. यावेळी अथर्वचा गळा आवळून किंवा डोक्यावर आघात करून हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. कारण अथर्वचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत होता. इतकच नव्हे तर त्याच्या डोक्याला मार लागल्याचेही स्पष्ट झाले.
अथर्वचे हात-पाय बांधून त्याचा मृतदेह पुलावर टाकण्यात आल्याने अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. यावेळी वडिलाच्या प्रॉपर्टी आणि आर्थिक व्यवहारांच्या कारणातून हे अपहरण आणि हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात असून शहर पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वेगवेगळ्या टीम करुन आरोपीचा शोध घेत आहेत.