सरकारी कर्मचारी आणि काही पेन्शनधारकांना महागाई वाढल्यामुळे पगाराची क्रयशक्ती कमी होऊ नये, म्हणून मूळ पगाराच्या ठराविक टक्केवारीने DA दिला जातो.पंजाब सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) एकूण 8 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांचा DA 42% वरून थेट 50% पर्यंत वाढणार आहे. ही 8 टक्क्यांची वाढ एकाच वेळी न देता, दोन टप्प्यांत 4% + 4% अशा स्वरूपात दिली जाणार आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर मंत्री अमन अरोरा यांनी कर्मचारी नेत्यांसह पत्रकार परिषद घेऊन DA वाढीची अधिकृत घोषणा केली. या निर्णयाचा सुमारे 4 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 3.5 लाख पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 250 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांच्या पगारात वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, DA मधील पहिली 4% वाढ सप्टेंबरच्या पगारासोबत दिली जाईल, तर दुसरी 4% वाढ ऑक्टोबरच्या पगारात मिळेल. सप्टेंबर महिन्याचा पगार 9 ऑक्टोबरला होणार असल्याने, कर्मचाऱ्यांना वाढलेला DA याच दिवशी मिळण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात DA 58% वरून 60% करण्यात आला, म्हणजे 2 टक्के पॉइंटची वाढ झालेली आहे.
DA वाढीसोबतच इतरही अनेक प्रलंबित प्रश्न बैठकीत मांडले गेले. 2020 नंतर भरती झालेल्यांच्या वेतनातील तफावत, OPS ची मागणी, प्रोबेशन पिरियडमधील वेतन, प्रोफेशनल टॅक्स आणि कंत्राटी व संगणक शिक्षकांचे प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. मिड-डे मील कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीवरही चर्चा झाली असून, सरकारने सर्व मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.