मुंबई १० जून २०२३, प्रतिनिधी : बिपरजॉय चक्रीवादळ येत्या ३६ तासात तीव्र होणार आहे. राज्याच्या कोकण किनारपट्टीवर तसेच मुंबईच्या किनारपट्टीवर याचा फटका बसणार आहे. या सोबतच चार राज्यावर याचा परिणाम होणार आहे. पुढील दोन दिवसांत हे वादळ उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल, असे हवामान विभागाने सांगितले. अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग गुरुवारी कमी झाला होता. ६० किमी प्रतितास वेगाने चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकत होतं. परंतु त्यानंतर चक्रीवादळाचा वेग वाढला आहे. त्यामुळं केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कोकणच्या किनारी भागांत उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ येत्या दोन दिवसांत धडकणार आहे. कोकण किनारपट्टीवर सध्या वेगाने वारे वाहू लागले आहेत. या सोबतच गुजरातच्या किनारपट्टीवर देखील वेगाने वारे वाहू लागले आहेत. वलसाडमध्ये मोठ्या लाटा उसळत आहेत. डुमास आणि सुवलीमध्ये वेगाने वारे वाहू लागले असून १४ जूनपर्यंत येथील किनारी भाग बंद करण्यात आला आहे. मच्छिमारांना आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील अनेक शहरांमधील पुढील २४ तासांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळं दिलासा मिळणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानच्या किनारी भागांमध्ये येत्या काही तासांत धडकणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत भारताच्या किनारी भागांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार आहे.
याचा फटका चार राज्यांनया बसणार आहे. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांना या वादळाचा फटका बसणार आहे. हे वादळ येत्या ३६ तासांत तीव्र होणार असून दोन दिवासात ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार आहे. भारतासह ओमान, इराण, पाकिस्तान या देशांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.