Cyber Fraud: शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष; डॉक्टरांची 96 लाखांची सायबर फसवणूक

कमी गुंतवणुकीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन या जाहिरातीत देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी संबंधित लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

Cyber Fraud: शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष; डॉक्टरांची 96 लाखांची सायबर फसवणूक

पुण्यातील एका 49 वर्षीय डॉक्टरांची शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ९५ लाख ६६ हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरांना सोशल मीडियावर शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील एक आकर्षक जाहिरात दिसली. कमी गुंतवणुकीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन या जाहिरातीत देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी संबंधित लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

सायबर भामट्यांनी स्वतःला शेअर बाजारातील तज्ज्ञ असल्याचे सांगत डॉक्टरांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शेअर्सचे विश्लेषण करून गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे सांगून एका संकेतस्थळाची लिंक पाठवण्यात आली. पुढे मोबाईलवर एक अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले आणि त्याच अॅपच्या माध्यमातून शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. भामट्यांनी दाखवलेल्या बनावट नफ्याच्या आकड्यांवर विश्वास ठेवून डॉक्टरांनी टप्प्याटप्प्याने विविध व्यवहार केले.  जून ते 16 जुलै या कालावधीत त्यांनी एकूण 95 लाख 66 हजार रुपये संबंधित खात्यांमध्ये जमा केले.

मात्र, गुंतवलेल्या रकमेचा परतावा काढण्याचा प्रयत्न करताच विविध कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ शिवाजीनगर सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा नोंदवला असून आर्थिक व्यवहार, मोबाईल अॅप, संकेतस्थळ आणि संबंधित बँक खात्यांचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील आकर्षक गुंतवणूक योजनांवर सहज विश्वास ठेवू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, तसेच केवळ सेबी (SEBI) मान्यताप्राप्त आणि अधिकृत गुंतवणूक प्लॅटफॉर्मचाच वापर करावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number