छत्रपती संभाजीनगर: देशात तसेच राज्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. विविध प्रकारचे नवे डावपेच वापरून सायबर भामटे ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य नागरिकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारत आहेत. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून ही चिंतेची बाब ठरत आहे.
अशातच छत्रपती संभाजीनगर येथून सायबर फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्ह्यांतून मिळणारी रक्कम जमा करण्यासाठी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बँक खाती भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका उच्चशिक्षित तरुणाने कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा दोन ते तीन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती आणि संबंधित तपशील घेतल्याचे समोर आले आहे. सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जात होती.
या व्यवहारासाठी संबंधित खात्यांसोबत एटीएम कार्ड आणि चेकबुकचाही वापर करण्यात येत असल्याचेही तपासात समोर आले आहे. काही विद्यार्थ्यांनी पैसे मिळत असल्यामुळे स्वतःहून आपली बँक खाती भाडेतत्त्वावर दिल्याचेही समजते.
दरम्यान, पोलिसांनी वेळेत सतर्कता दाखवत या प्रकरणाची दखल घेतली आणि कारवाई सुरू केली. तपासादरम्यान गुजरात आणि बंगळूर येथून संबंधित बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत असल्याचे आढळून आले.
या खात्यांमध्ये अवैध मार्गाने पैसे जमा होत असल्याची कल्पना खातेधारकांना नव्हती. मात्र संबंधित तरुण एटीएममधून पैसे काढताना पोलिसांच्या ताब्यात सापडला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या आरोपीसोबतच त्याने इतर ठिकाणीही अशा प्रकारचे सायबर गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपासात या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे प्रकरण गंभीर असल्याने नागरिकांनी बँक खाती, एटीएम कार्ड किंवा वैयक्तिक आर्थिक माहिती कोणालाही देऊ नये, तसेच सतर्क राहून आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाने केले आहे.