त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे अमरावतीमधील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
अमरावतीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशसनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला असून ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. तसेच अमरावतीत इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या बंदला हिंसक वळण लागले. तर बंददरम्यान अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून वार्तांकनादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर दगडफेक करण्यात आली. अमरावतीमध्ये जातीय तणाव चिघळला, असून शिवसेनासुद्धा या बंदमध्ये सहभागी झाली. तसेच आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
त्रिपुरा हिंसाचार घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावतीमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करण्यास सुरवात केली असून पोलिसांवरही दगडफेक केली. आंदोलकांनी दुकानासह ४ गाड्या पेटवल्या दरम्यान आंदोलकांची गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला.
त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद मालेगावातही मोठ्या प्रमाणात उमटले आहे. त्यामुळे आंदोलकांच्या हिंसाचारानंतर मालेगावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. मालेगावातील आंदोलनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तसेच हिंसाचार, दगडफेक करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकसत्र सुरू करण्यात आले आहे.
नांदेडमध्येही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी नांदेड शहरातील शिवजी नगर आणि देगलूर नाका भागात दगडफेक झाली होती यात खासगी वाहनांची तोडफोड झाली तसेच पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यामुळे या हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हाप्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.