जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एलफिन्स्टन मध्ये घडलेली दुर्घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणारी घटना घडली आहे.
रेल्वे अपघातांच्या मालिका अद्याप सुरुच आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ कर्जतकडे जाणारी लोकल रुळावरून घसरली आहे. सीएसएमटी ते मस्जिद दरम्यान लोकलचा एक डबा रुळावरून घसरला आहे. मोटरमनच्या डब्याची दोन चाकं रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सीएसएमटीवरून कर्जतला जाणारी लोकल दुपारी १.४०च्या सुमारास रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून ही लोकल निघाली होती. प्लॅटफॉर्मवरून निघाल्यानंतर दोनच मिनिटात मोटरमनच्या डब्याची चाकं रुळावरून घसरली. अपघात घडला तेव्हा लोकलमध्ये ६० प्रवासी होते. मात्र लोकलचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकल रुळावरून घसरल्याने डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या काही काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.