उत्तर प्रदेशातील फिरोजाबादच्या शिकोहाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका निष्पाप दीड वर्षाच्या मुलाला रस्त्यावरच मारहाण करून ठार करण्यात आले. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. फुटेजमध्ये जे दिसले त्याने सर्वांना धक्का बसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजाबादमध्ये, एकतर्फी प्रेमापोटी एका तरुणाने दीड वर्षाच्या मुलाला मारहाण करून ठार केले. त्याने मुलाला उचलून जमिनीवर आठ वेळा आपटले. आरोपी हा त्या महिलेचा नातेवाईक असून, तिने त्याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे तो संतापला होता.
विराज आरवला चॉकलेट विकत घेण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. थोड्या अंतरावर गेल्यावर रस्ता रिकामा असल्याचे पाहून त्याने त्या मुलाला आठ वेळा जमिनीवर आपटले. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर विराजने आरवला आपल्या हातात घेतले, घराबाहेर सोडून तो पळून गेला.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात तो तरुण मुलाची हत्या केल्यानंतर आजूबाजूला पाहताना दिसत आहे. त्यानंतर तो मृतदेह घराबाहेर टाकून पळून जातो. शनिवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत आरोपीच्या दोन्ही पायांत गोळ्या झाडून पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना शिकोहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
चौकशीदरम्यान, आरोपीने गुन्हा कबूल केला आणि खून केल्याचे सांगितले. त्याने असाही दावा केला की, त्याचे मुलाच्या आईसोबत प्रेमसंबंध होते आणि ती त्याला ब्लॅकमेल करत होती. त्यांच्या प्रेमसंबंधातून आणि एका वैयक्तिक वादामुळे त्याने हा गुन्हा केला होता.