Lonavala Rain Update: मुंबई, पुणे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुका आणि लोणावळा परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पर्यटनस्थळांवर पाण्याचा वेग वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 अंतर्गत विशेष निर्बंध लागू करण्यात आले असून, हे आदेश 6 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 31 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाई
प्रशासनाच्या आदेशानुसार पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत असलेल्या धबधबे, नद्या, ओढे आणि धरणांच्या पाण्यात उतरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच जीव धोक्यात घालून कड्यांच्या टोकावर उभे राहणे, सेल्फी काढणे, रिल्स किंवा व्हिडिओ शूट करणे यालाही सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
लोकप्रिय पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष
भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण, एकवीरा देवी मंदिर परिसर तसेच लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग या गड-किल्ल्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र अतिवृष्टीमुळे या ठिकाणी घसरून पडणे, पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणे किंवा दरड कोसळण्यासारखे प्रकार घडण्याची शक्यता वाढल्याने प्रशासनाने या सर्व भागांमध्ये विशेष खबरदारीचे आदेश जारी केले आहेत.
मद्यपान, ध्वनीप्रदूषण आणि बेशिस्त वर्तनावरही कारवाई
पर्यटनस्थळांवर मद्यपान करणे, मोठ्या आवाजात संगीत वाजवून ध्वनीप्रदूषण करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. महिलांची छेडछाड, बेदरकार वाहनचालक आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार आहेत. याशिवाय धरण परिसर आणि नदीकाठच्या संवेदनशील भागात 4 आणि 6 चाकी वाहनांच्या प्रवेशालाही प्रतिबंध करण्यात आला आहे.
खंडाळा-मंकी हिल दरम्यान रेल्वे मार्ग दुरुस्तीला वेग
दरम्यान, लोणावळा-कर्जत घाट विभागातील मंकी हिल आणि खंडाळा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुरुस्तीचे कामही वेगाने सुरू आहे. किलोमीटर 121 ते 123 या पट्ट्यात दरड कोसळल्यामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात माती आणि खडक साचले आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने आधुनिक यंत्रसामग्रीसह विशेष पथके तैनात केली आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
सततचा पाऊस, धुके आणि प्रतिकूल हवामानामुळे दुरुस्तीच्या कामात अडचणी येत असल्या तरी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून रेल्वे वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना नियमांचे पालन करून अनावश्यक जोखीम टाळण्याचे आवाहन केले आहे.