राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक यात्रा रद्द केल्या जात आहेत. शिर्डीतही रामनवमी उत्सवासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पालख्या घेऊन भक्त येतात. मात्र त्यांनी पालख्या आणू नयेत किंवा त्यातील भक्तांची संख्या मर्यादित असावी अस आवाहन साई संस्थानने केले आहे.
शिर्डीमध्ये होणाऱ्या प्रमुख उत्सवापैकी रामनवमी हा एक मुख्य उत्सव. मात्र या त्सवावरही कोरोना व्हायरसचं सावट पसरलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या रामनवमी उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीला येतात. त्यात प्रामुख्याने मुंबई आणि इतर ठिकाणाहून पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. गुडीपाडव्यानंतर हे भाविक शिर्डीकडे निघतात. या वेळी शिर्डी गावची यात्राही भरते.
मात्र सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालण्याने अनेक ठिकाणच्या यात्रा रद्द केल्या जात आहेत. येत्या 2 एप्रिलला रामनवमी आहे. मात्र या रामनवमीला पायी पालख्या आणू नयेत किंवा आणायच्या असल्यास त्यातील भाविकांची संख्या मर्यादीत असावी असं आवाहन साई संस्थान प्रशासनाकडून या पालखी मंडळांना करण्यात येतंय.
शिर्डीला रामनवमीला येणाऱ्या पालख्यांची संख्या शंभरहून अधिक असते त्यात लहान मोठ्यांसह महिलांचाही सहभाग मोठा असतो. एका एका पालखीत हजारो भक्त सहभागी होत असतात.
ते येणाऱ्या पालखी मार्गावर साई संस्थानच्या वतीने वैद्यकीय सुविधा पुरविली जाते, मात्र कोरोनाचा धोका मोठा असल्याने या पालख्या बाबत योग्य वेळी काळजी घेण्याची आणि निर्णय घेण्याची गरज आहे.
शिर्डीची रामनवमीला होणारी यात्राही भरवायची की नाही या बाबत ग्रामस्थ येत्या 25 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेणार आहे.