वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढच होत चालली आहे. दरांच्या चढत्या आलेखामुळे नागरिक त्रस्त होऊन सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स कन्ननथानम यांनी पेट्रोल – डिझेलच्या वाढीव दराबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
”पेट्रोल- डिझेल हे गरीब लोक खरेदी करत नाहीत, तर ज्यांच्याकडे कार आणि बाईक आहेत तेच लोक खरेदी करतात, आणि हे लोक भुकेने मरत नाहीत. त्यामुळे त्यांना कर देखील भरावा लागेल’’. अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स कन्ननथानम यांनी केले आहे.
पेट्रोलच्या वाढीव दरामुळे नागरिकांकडून सरकारला जो महसूल मिळतो, त्याचा वापर करुन आपण विकास कामे करणार असल्याचे देखील अल्फोन्स कन्ननथानम यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कन्ननथानम यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांकडून सर्वत्र टीका केली जात आहे.