महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी आज काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. भाजपासह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी पंतप्रधान मोदींचा निषेध करावा, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे.
मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात काँग्रेसने शर्म करो मोदी आंदोलन केले. महाराष्ट्राच्या अपमानाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, यासाठी काँग्रेस आक्रमक झाला असून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी काँग्रेस आंदोलन करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल भाषणात महाराष्ट्राने कोरोना पसरवल्याचे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला. त्यामुळे याच्या निषेधार्थ येवला विंचूर चौफुली येथे काँग्रेस कमिटीच्यावतीने शर्म करो मोदी आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
देशात कोरोना पसरवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले असून पंतप्रधान मोदीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस बुधवारपासून ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेत दिली होती.