अदाणी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने या घोटाळ्याप्रश्नी काँग्रेस पक्षाने आवाज उठवला. सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसकडून राजभवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, राजभवनाला जाण्याअगोदरच पोलिसांकडून काँग्रेसचा मोर्चा रोखण्यात आला.
अदाणी घोटाळ्याप्रकरणी सत्ताधारी पक्षाने अद्याप आवाज उठवला नाही. मात्र, अदाणी प्रकरणात काँग्रेसने सोमवारी धडक मोर्चा काढला. नाना पटोले यांच्या अध्य़क्षतेखाली गिरगाव चौपाटीवरून काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झाली. मात्र, राजभवनात पोहचण्याअगोदरच पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखला. यावेळी अदाणी महाघोटाळ्याविरोधात मोर्चा काढला असल्याचे काँग्रेसने सांगितले.
अदाणी घोटाळ्याविरोधात नाना पटोले म्हणाले, मोदी सरकार अदाणीला पाठीशी घालत आहेत. राज्यात दोन दिवसांतच माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. विरोधी पक्षाच्या मागे ईडी चौकशी लागली आहे. मात्र, सत्ताधारी अदाणी घोटाळ्याची चौकशी का करत नाही? असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे याप्रकरणी जनतेच्या हितासाठी काँग्रेसने आवाज उठवला असून राजभवनावर धडक मोर्चा काढला असल्याचे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसच्या या मोर्चात काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते.