राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. पक्षाच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, अशातच राजकारणात घडामोड घडली असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसनेही मतदानाचा कोटा वाढवला आहे. काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांच्यासाठी काँग्रेसने मतांचा कोटा ४४ केला आहे. त्यामुळे आता शिसवेनेची गोची होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांची मतं धोक्यात येण्याची शक्यता आहे.
राज्यसभेची निवडणूक विजयी होण्यासाठी उमेदवाराला ४२ मतं लागणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दोन नेते अटकेत असल्यामुळे राष्ट्रवादीची दोन मतं कमी झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने ४२ मतांचा असलेला कोटा ४४ केला आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठीचा उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी पवारांनी मतांचा कोटा वाढवला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे आमदार मविआला पाठिंबा करणार असल्याचे सांगितले आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी एमआयएमने मविआला मतदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले. तसेच एमआयएमचे दोन्ही आमदार काँग्रसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.