‘बागेश्वर धाम सरकार’ म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम आज मीरा-भाईंदरमध्ये होत आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही आज मीरा रोड परिसरात हा कार्यक्रम पार पाडत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री आज पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर उपस्थित शेकडो भक्तांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं जोरदार स्वागत केलं.
संध्याकाळी पाच वाजता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं दिव्य दर्शन होणार आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारीही आयोजकांकडून करण्यात आली आहे. अंनिसवतीने शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबई दौरा सफल होणार का हे आता पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरात १८ आणि १९ मार्च दोन दिवस धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज मीरा रोड येथे महादिव्य दरबार सजणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आशीर्वाद आणि विभूती वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसने विरोध केला आहे. नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती.