मुंबई, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : जय महाराष्ट्र न्यूज या प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीच्या लक्षवेधी या लोकप्रिय कार्यक्रमात काका पुतण्याच्या भेटीने भूकंप का ? अंतर्गत सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेसचे प्रवक्ते कपिल डोके यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बोलणाऱ्या अजित पवार यांना राजकीय भविष्यासाठी पुन्हा एकदा पवारांचीच गरज आहे, असे कपिल डोके म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या MET कॉलेजमध्ये बोलताना अजित पवार यांनी शरद पवार विरोधी भूमिका घेतली होती. शरद पवारांवर संशय घेणारे अजित पवार आज इतके लगेचच का बदलले की आज त्यांना शरद पवार सोबत पाहिजे आहेत. आता अजित पवारांना शरद पवारांची इतकी गरज का भासते आहे ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते कपिल डोके म्हणाले. याआधी राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्याविषयी एक राजकीय वक्तव्य केले. भाजपकडून अजित पवारांना अट घालण्यात आली असावी. शरद पवार यांना सोबत आणाल तर मुख्यमंत्री करू अशी ही अट असावी. यामुळेच अजित पवार फारकत घेतली तरी वारंवार शरद पवार यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.