राज्यात मागील काही दिवसांपासून जुन्या पेन्शनसाठी सुरू असलेला संप मुंबईतील संपकऱ्यांनी मागे घेतला आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी संप मागे घेण्याबाबत घोषणा केली आहे. मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असला तरीही पेन्शनच्या संपावर गोंधळ कायम आहे. नाशिक आणि पुण्यात सरकारी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसरकारने संपकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, असा दावा काटकर यांनी केला आहे. तसेच राज्यसरकारने याबाबत लेखी आश्वासनही दिले असून मंगळवारपासून कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होणार असल्याचे काटकर म्हणाले.
राज्यात अनेक दिवसांपासून सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. मात्र, आता कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने सामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला. संपकारी कर्मचाऱ्यांमुळे राज्यातील आरोग्यसेवा कोलमडून गेली होती. तसेच, अवकाळीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांना खिळ बसली होती. मात्र, आता संप मिटल्याने नुकसानीचे पंचनाम्यांना वेग येणार असल्यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे.
मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला. मात्र, पुणे आणि नाशिक येथील कर्मचारी संपावर ठाम आहेत. जुनी पेन्शन योजना जोपर्यंत आमलात आणत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका पुणे आणि नाशकातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.