उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे. अशातच भारतीय हवामानाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई–कोकणात थंडीसह दमट वातावरण असू शकते, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात सौम्य थंडी, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी अशी स्थिती राहणार आहे. सध्या राज्यातील किमान तापमान 10°c च्या खाली नोंदविण्यात आला असून राज्यातील काही भागात तापमान 5 सेल्सिअसपर्यंत खाली जात असल्यामुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा- Thane Election 2026: तुमच्या प्रभागात कोण उभा आहे? उमेदवारांची 'A टू Z' यादी एका क्लिकवर
यावेळी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर थंडीचा प्रभाव मर्यादित राहणार आहे. मुंबईत किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. जळगाव, मालेगाव, नाशिक, गोदिंया, भंडारा, नागपूर येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच पुण्यात किमान तापमान 11 ते 13 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता असून विशेषतः हवेली, मुळशी, दौंड आणि शिरूर भागात पहाटे थंडी अधिक जाणवेल.
धुळे येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस इतके आहे. जळगावमध्ये 9.2 अंश, तर भंडारा येथे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत गारठ्याची जाणीव अधिक होत आहे. दरम्यान तामिळनाडूसह दक्षिण भारतातील एकूण पाच राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबईजवळील शहरात भूकंपाचे धक्के जाणवले असून काही गावं भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात रात्रीच्या सुमारास 3.2 इतक्या रिश्टर स्केलवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यानंतर आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.