उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. प्रयागराजमध्ये एक कोल्ड स्टोरेज इमारत कोसळली असून, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराजमधील कोल्ड स्टोरेज इमारतीत सुमारे 100 हून अधिक लोक काम करतात.
तेथील कोल्ड स्टोरेज सुविधेचे छत कोसळल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाची पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचली असून, शर्थीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे बचावकार्य सुरू आहे. दरम्यान अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती निर्माण झाली असून स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरू केले आहे.
या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये घटनास्थळी गोंधळाचे वातावरण दिसत आहे, तसेच लोक जखमींना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी धावपळ करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरून अमोनिया वायूची गळती झाल्याचेही वृत्त आहे. हे कोल्ड स्टोरेज समाजवादी पक्षाचे माजी आमदार अन्सार अहमद यांचे असल्याचे सांगितले जात आहे.