देशातील तरुणांबाबत करण्यात आलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, त्यातूनच आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचा नवा राजकीय पक्ष चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पक्षाची जोरदार चर्चा सुरू असून, हजारो तरुण या मोहिमेला पाठिंबा देताना दिसत आहेत. मीम्स, रील्स, पोस्ट्स आणि उपरोधिक प्रतिक्रियांमुळे हा विषय इंटरनेटवर ट्रेंड होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात देशाचे मुख्य न्यायमूर्ती सुर्य कांत यांच्या एका वक्तव्यापासून झाली. एका सुनावणीदरम्यान त्यांनी काही तरुणांची तुलना झुरळांशी केल्याचे सांगितले जात आहे. रोजगार नसलेले आणि सतत सोशल मीडियावर टीका करणारे तरुण अशा शब्दांत त्यांनी टिप्पणी केल्याने अनेक तरुणांनी नाराजी व्यक्त केली.
याच वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभिजीत दिपके यांनी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी थेट ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने उपरोधिक राजकीय पक्षाची घोषणा केली. सुरुवातीला अनेकांना हा केवळ विनोद किंवा इंटरनेट ट्रोलिंगचा भाग वाटला, मात्र काही तासांतच या नावाने सोशल मीडिया अकाउंट्स आणि वेबसाईट सुरू झाल्यानंतर हा विषय गंभीर चर्चेत आला.
विशेष म्हणजे, या पक्षाच्या सोशल मीडिया हँडल्सला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटला हजारो लोकांनी फॉलो केलं असून इन्स्टाग्रामवरही लाखोंच्या घरात फॉलोअर्स वाढत आहेत. तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी, करिअरचा ताण आणि व्यवस्थेविषयीचा असंतोष या पार्श्वभूमीवर अनेक जण या मोहिमेला प्रतीकात्मक समर्थन देताना दिसत आहेत.

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वेबसाईटवर पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात ‘आळशी आणि बेरोजगारांचा आवाज’ अशी ओळ विशेष चर्चेत आली आहे. हा संदेश प्रत्यक्षात व्यवस्थेला दिलेला उपरोधिक टोला मानला जात आहे. स्वतःला दुर्लक्षित समजणाऱ्या तरुणांच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा प्रयोग केल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे.
सोशल मीडियावर या पक्षासंदर्भात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याकडे तरुणांच्या संतापाचा डिजिटल आवाज म्हणून पाहत आहेत, तर काहींनी यावर टीकाही केली आहे. मात्र, काही तासांत एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहता हा विषय आता केवळ मीमपुरता मर्यादित राहिलेला नाही.
राजकीय आणि सामाजिक स्तरावरही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. इंटरनेटच्या युगात उपरोधिक आंदोलनं किती वेगाने लोकांपर्यंत पोहोचू शकतात, याचं हे ताजं उदाहरण मानलं जात आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ पुढे प्रत्यक्ष राजकीय चळवळ बनणार की सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.