जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
कोल्हापुरमध्ये शिक्षिकेकडून विद्यार्थीनीला पाचशे उठाबशांची शिक्षा देण्याची अमानुष घटना ताजी असतानाच, नांदेडमध्येही अशीच धक्कादायक घटना घडलीय. दहावीत शिकणा-या एका विद्यार्थ्यास खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाने शुल्लक कारणावरुन प्लास्टीकच्या पाईपने दोन्ही हात, पाठीवर अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत अमानुष मारहाण केली आहे.
नांदेडच्या विवेकनगर भागातील मानसपुरे कोचिंग क्लासेसचे संचालक तथा शिक्षक भिमाशंकर मानसपुरे यांनी दहावीत शिकणा-या सिध्दांत नरवाडे यास हजरी पत्रिका पान का फाडलं? या शुल्लक कारणावरुन प्लास्टीकच्या पाईपने बेदम मारहाण केली.
सिध्दांतने आपण हजेरी पत्रिका पान फाडले नसल्याचे कळकळुन सांगतानाही संबधित शिक्षकाने सिध्दांतचे काहीही ऐकून न घेता मारहाण चालूच ठेवली. दरम्यान, हा सर्व प्रकार सिध्दांतने घरी सांगितला. त्यानंतर निर्दयी शिक्षक भिमाशंकर मानसपुरे विरूध्द पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात कोचिंग क्लासेसच्या शिक्षका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.