मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत शिंदे, फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. तर शिवसेना, भाजपाचे शक्तीप्रदर्शन अयोध्येत पाहायला मिळाले. मात्र, दुसरीकडे शिंदे-फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केले जात आहे. राज्यातील प्रश्न सोडून सत्ताधारी अयोध्येत गेले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. तसेच अनेक जनावरे दगावली आहे. अशा परिस्थित नुकसानीचे पंचनामे करून त्याचे अहवाल तात्काळ पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. तसेच, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे नैसर्गिक आपत्ती असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नसून त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार विविध भागांत जाऊन नुकसानीचे पंचनामे करत आहेत. त्यामुळे आम्ही जरी अयोध्येत असलो तरी शेतकऱ्यांच्या मदतीचे कार्य सुरू आहे. मविआ सरकारकारच्या काळात शेतकऱ्यांना काय मदत मिळाली हे सर्व जनतेला माहित आहे. मविआ सरकारने घोषणा केल्या मात्र, सामान्यांचं शिंदे-फडणवीस सरकार घोषणांची पूर्तता करत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिंदे-फडणवीस सरकार हे संवेदनशील सरकार आहे. तसेच राज्यातील बळीराजा संकटातून बाहेर येण्याची प्रार्थना आम्ही प्रभु राम चरणी करणार आहोत, असे शिंदे म्हणाले.