जळगाव : जळगाव जिल्ह्यात ढगफुटीजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तब्बल 10 गावे या आपत्तीच्या विळख्यात सापडली आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 452 घरे पाण्याखाली गेली असून सुमारे 2,500 हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच, सुमारे 250 जनावरे आणि जवळपास 1,800 लहान प्राण्यांचा बळी गेला आहे. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गावातील नदी-नाले तुडुंब भरले आणि पाणी थेट घरात घुसले.
आपत्तीग्रस्त नागरिकांना मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) तातडीने कार्यरत झाले असून, अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. ज्या कुटुंबांचे राशन वाहून गेले आहे त्यांना विशेष मदत दिली जात आहे. दरम्यान, प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा देखील सुरळीत करण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “सलग दोन दिवस चार तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या अडचणीत आले आहेत. सर्व शासकीय यंत्रणांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई लवकरच दिली जाईल.” या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, पशुपालक आणि गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाकडून मदतकार्य गतीमान करण्यात आले आहे.
Cloud burst situation in Maharashtra's Jalgaon, 10 villages affected: District Collector Ayush Prasad Read @ANI Story | https://t.co/EEwHTvaGSo#CloudBurst #Maharashtra #rain #Jalgaon pic.twitter.com/viLLjqWclm — ANI Digital (@ani_digital) September 17, 2025