हरियाणाच्या मेवात जिल्ह्यात हिंसाचाराची मोठी घटना घडली. या हिंसाचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर मेवात जिल्ह्यातील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे.
हरियाणाच्या नूंह येथे आज (३१ जुलै) दोन गटांमध्ये मोठी झडप झाली. यामध्ये २ होमगार्ड्सचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मेवात जिल्ह्याच्या नूंह येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. पण यात्रा पुढे जात असताना नांद गावाजवळ एका गटाने ही यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही बाजूने झडप झाली. यावेळी दगडफेक देखील झाली. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूची लोक आमनेसामने आले. यावेळी यात्रेत सहभागी असलेल्या वाहनांना आग लावण्यात आली. पुढे हा हिंसाचार सोहनापर्यंत पोहोचला. सोहना येथे अनेक दुकान आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. सोहना बायपास रोडवर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सोहनामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.