सांगली, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी या गावातून मुढेवाडीला जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांना छोट्या होडक्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. आटपाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन आमदारांपैकी एकानेही या प्रकरणात लक्ष घातलेले नाही. यामुळे एकविसाव्या शतकातही शेंडगेवाडीतील नागरिकांचे हाल होत आहेत.
शेंडगेवाडीत पशूवैद्यकीय सोयी उपलब्ध नाहीत. यामुळे पाळीव प्राण्यांची तब्येत बिघडली तर वेळीअवेळी छोट्या होडक्यातून जीव धोक्यात घालून मुढेवाडीला जायचे आणि डॉक्टरांना घेऊन यायचे अथवा शक्य असल्यास होडक्यातून पाळीवर प्राण्याला मुढेवाडीला न्यायचे असे प्रकार करावे लागत आहेत. शेंडगेवाडीत बोरवेल पण नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना तर स्थानिक अनेकवेळा करतात. यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे, अशी मागणी शेंडगेवाडीचे नागरिक करत आहेत.