अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेचं समर्थन थांबवा; चित्रा वाघ यांची एजाज खानच्या शोवर टीका

'हाऊस अरेस्ट' शोवरून संताप; चित्रा वाघ यांची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी, तातडीने बंद करण्याची मागणी.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेचं समर्थन थांबवा; चित्रा वाघ यांची एजाज खानच्या शोवर टीका

मुंबई: काही काळापूर्वी समाय रैनाच्या India's Got Latent Show मधील एका व्हिडीओवरून निर्माण झालेला वाद चर्चेचा विषय ठरला होता. तो वाद आता निवळला असला तरी, आता नव्याने अभिनेता एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. या शोविरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी करत हा कार्यक्रम तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.

हा शो अश्लीलतेचा कळस आहे

चित्रा वाघ यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं, स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू ॲपवर प्रदर्शित होणाऱ्या या शोचे क्लिप्स सोशल मीडियावर मुक्तपणे फिरत असून, हे दृश्य अत्यंत घाणेरडे आणि खालच्या दर्जाचे आहेत. विशेषतः लहान मुलांच्या मोबाईलमध्ये हा कंटेंट सहज पोहोचतो आहे, जे अत्यंत धोकादायक आहे.

सांस्कृतिक मूल्यांची विटंबना

असे कार्यक्रम म्हणजे केवळ संस्कृतीचा अपमान नाही, तर समाजाच्या आरोग्यावरही परिणाम करणारे आहेत. हे कंटेंट भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृती निर्माण करणारे आहेत, अशी तीव्र टीका करत वाघ यांनी या प्रकारांवर तातडीने बंदीची गरज असल्याचे स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्र्यांना मागणी

वाघ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत म्हटलं, 'मी मंत्री @AshwiniVaishnaw जी यांना विनंती करते की, उल्लू ॲपसह असे विकृत कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी. ‘हाऊस अरेस्ट’ हा शो केवळ एक शो नसून समाजाच्या मूल्यांवर घाला आहे'.

ओटीटी माध्यमांवरील नियंत्रणावर प्रश्नचिन्ह

गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर खुलेपणाने दाखवले जाणारे बोल्ड आणि अर्धवस्त्र कपड्यांतले कंटेंट अनेकदा टीकेचे धनी ठरले आहेत. मात्र, सेन्सॉरशिपचा अभाव, मुलांसाठी सहज उपलब्धता आणि कोणतीही नैतिक जबाबदारी न घेता कंटेंट तयार होणं, ही गंभीर बाब बनत चालली आहे.

सरकार काय भूमिका घेणार?

चित्रा वाघ यांची मागणी आता जनतेतूनही पाठिंबा मिळवत आहे. यानंतर केंद्र सरकार यावर कोणती पावलं उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ओटीटी कंटेंटवर नियंत्रण आणण्याच्या चर्चेला यातून पुन्हा चालना मिळू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number